
>> विवेक दिगंबर वैद्य, [email protected]
हिंदू धर्माचे पुनुरुत्थान आणि सामाजिक सुधारणा हीच ज्यांची ओळख बनली त्या ‘संचारेश्वर’ पाचलेगांवकर महाराजांविषयी.
घरच्या मंडळींनी नरसिंहाचे लग्न करण्याचे ठरविले. मामा-मामींनी त्यांची लेक नरसिंहाला द्यायचे निश्चित केले, त्यानुसार बोलणी पार पडली. हे वृत्त कानी येताच नरसिंहाने विरोध दर्शविला आणि आपल्या मामाला सांगितले की, ‘माझ्या लग्नाचा विचार करण्यापेक्षा हे घर वाचवण्याचा विचार करा. आज हे घर जळून राख होईल आणि त्यासोबत आजीदेखील मरण पावेल.’ नरहरीची लग्नाविषयीची उदासीनता लक्षात घेता घरच्या मंडळींनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही; मात्र काही क्षणांनंतर एकाएकी उसळलेल्या आगीने घर पेट घेते झाले आणि त्याचवेळी देवघरात बसलेली आजी त्यात होरपळून मरण पावली. नरसिंहाच्या दैवी शक्तीची ही पहिलीच चुणूक होती.
अल्पावधीत भस्मीभूत झालेल्या घराची राख अंगाला भस्मासमान फासून वयाच्या आठव्या वर्षी नरसिंह कायमचा घराबाहेर निघाला. पुढील पाच वर्षे त्याच्यासाठी कठोर तपश्चर्येची होती. दररोज ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातर्विधी आटोपून व्यायाम करणे, दोनेकशे सूर्यनमस्कार घालणे, तितक्याच जोर-बैठका काढणे, कोसभर अंतर धावत पार करणे, त्यानंतर स्नानादी विधी पार पडले की ध्यानधारणा करणे, माध्यान्ही तीन घरी भिक्षा मागणे आणि त्यानंतर ग्रंथ-पुराणांचा अभ्यास करणे ही एव्हाना नित्यकर्मे झाली होती. दैनंदिन कार्ये आटोपली की, नरसिंह गावातील तरुणांना योग आणि व्यायामाचे शिक्षण देत असे. प्रत्येक ठिकाणी जास्त काळ न रेंगाळता सतत विविध गावांमध्ये संचार करून तेथील युवा मंडळींकडून व्यायाम करवून घेणे आणि त्यांना अध्यात्मज्ञान अवगत करून देणे याद्वारे समाजोन्नती आणि स्वतःच्या अध्यात्माचा पाया बळकट करणे हे पूर्णत्वास आल्यावर नरसिंह पाचलेगांवी परतला.
नरसिंह माघारी परतल्यावर ‘संचारेश्वर’ या नावाने ओळखला जाऊ लागला. दरम्यान, माधवाश्रम स्वामींनी संचारेश्वरांना त्यांच्या मूळ रूपाची अर्थात श्रीनारायण दत्तानंद अवताराची ओळख पटवून दिली आणि त्यांच्या हस्ते पाचलेगांवामध्ये मुक्तेश्वराची स्थापना केली. येथून पुढे लोणी गावातील ख्यातकीर्त सत्पुरुष श्रीसखाराम महाराज यांच्या समाधीला वंदन करून संचारेश्वर पाचलेगांवकर महाराज भ्रमणासाठी निघते झाले. दरम्यान, संचारेश्वरांचा धर्म आणि धर्माचरणाविषयीचा अभ्यास सुरू होता. अवतीभवतीची परिस्थिती पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. तत्कालीन निजाम सरकारचे हिंदूविरोधी आचरण पाहून संचारेश्वर आक्रमक झाले. हिंदू धर्मातील सहिष्णुता, कार्यकारणभाव, लोकसंस्कृती, परस्परसंबंध यांचे उपजत ज्ञान असलेल्या संचारेश्वरांनी ‘हिंदुधर्म’ प्रस्थापित करण्यासाठी चळवळ आरंभली. मुस्लिम आणि ख्रिश्चन’ लोकांकडून जोरजबरदस्तीने बाटविण्यात आलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करून त्यांना माघारी आणले. यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मेळावे घेतले.
संचारेश्वरांचे हिंदू पुनरुत्थानाचे कार्य, ओजस्वी विचार आणि ओघवत्या वक्तृत्वाला जनमानसाचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून निजामाने त्यांना, ‘प्रतिमाही तनखा देतो मात्र धर्मप्रसार, प्रचार बंद करा’’ असे सुचविले; परंतु महाराजांनी निजामास दाद लागू दिली नाही. कंटाळून निजामाने संचारेश्वरांना राज्यातून हद्दपार केले, तरीही ते बधले नाहीत. संचारेश्वर महाराजांना दीनदुबळय़ा, दुःखी-कष्टी माणसांबद्दल अपार कळवळा होता. त्यांनी अध्यात्माचा उपयोग चमत्कार वगैरेंसाठी न करता समाजप्रबोधन, जनजागृती यासाठी केला. प्रत्येक तरुणाने शरीरसौष्ठव राखले पाहिजे. शरीर सुदृढ बनावे यासाठी चांगला आहार घेतला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. समाज ‘शिस्तबद्ध’ असला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यांची अमोघ व ओघवती वाणी, उत्तम स्मरणशक्ती व उपजत वक्तृत्व कलेमुळे त्यांचे शिष्य व प्रवचनास येणाऱया भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांचे चौफेर वाचन व दांडग्या अभ्यासामुळे अध्यात्म, विज्ञान आणि सामाजिक विषयांवर भाष्य करताना साधीसोपी भाषा आणि उदाहरणांसहित विषय समजावण्याची हातोटी उल्लेखनीय ठरल्याचे मत त्यांचे चरित्रकार मोहन कुलकर्णी यांनी ’श्रीसंचारेश्वर चरित्रामृत’ यामध्ये मांडलेले आहे.
देशप्रेम, राष्ट्रप्रेम यांचा धगधगता अंगार संचारेश्वर महाराजांमध्ये प्रकट झाला. त्यांच्या तरुणपणीचा काळ व स्वातंत्र्याची चळवळ हा एकच कालखंड असल्याने त्यांनी ब्रिटिशांची दडपशाही व बेमुवर्तखोर जुलमी राजवट याविरुद्ध रान उठविले. आपली भूमिका समजावून देण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद आदींची भेट घेतली. स्वदेशी चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले. संचारेश्वरांनी ‘मुक्तेश्वर दल’ संघटना स्थापन करून राष्ट्रकार्य जोमाने चालू ठेवले. याअंतर्गत त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन कार्य, धर्मांतर केलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण आदी महत्त्वाची कार्ये केली.
संचारेश्वरांचे देशकार्य पाहून वीर सावरकर अतिशय प्रभावित झाले आणि त्यांच्या भेटीस आले. सावरकरांनी पुढे संचारेश्वरांची तीन वेळा भेट घेतली. खामगाव येथे संपन्न झालेल्या हिंदू संघटन महायज्ञामध्ये हे दोन्ही क्रांतिकारक सत्पुरुष उपस्थित होते. पुढे काही वर्षांनी हिंदूंचे व्यापक हित लक्षात घेऊन संचारेश्वरांनी त्यांची ‘मुक्तेश्वर दल’ ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विसर्जित केली.
‘चमत्कार ही चोरी आहे’ असे जाहीररीत्या सांगणारे, बुवाबाजीच्या विरोधात लढणारे, श्रमदान-सहभोजन-प्रबोधन-सर्वधर्म समभाव आणि अस्पृश्यता निवारण यांना प्राधान्य देणारे, दारूबंदीसाठी पुढाकार घेत निरपेक्ष भावनेने समाजसुधारणा करणारे, विषारी-बिनविषारी सर्पांविषयीचे समज-गैरसमज दूर करणारे पर्यावरणवादी, सच्चे धर्माभिमानी, राष्ट्रप्रेमी, अभ्यासू, आक्रमक विजिगिषु, ध्येयवादी, बंडखोर या व अशा अनेक उत्तुंग प्रतिमांमधून वावरलेले संचारेश्वर पाचलेगांवकर महाराज १६ ऑगस्ट १९८६ रोजी शांत झाले.
समर्थांनी रचलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे स्तोत्र सध्याच्या युगामध्ये ज्यास चपखलपणे लागू होईल असा, ‘हनुमंत’ हे ज्याचे प्रिय दैवत होते असा हा कार्यकर्तृत्वाने धगधगणारा ‘संचारेश्वर’ शनिवारी सूर्योदय होताच लौकिकाची वेस ओलांडून क्षितिजापार गेला. लोप पावला. सर्वसाधारणपणे संतसत्पुरुष म्हटले की, त्यांचे लीला-चमत्काराने व्यापलेले आध्यात्मिक जीवन समोर येते; मात्र संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचे अवतारकार्य पाहता त्यांना तत्कालीन समाजव्यवस्थेमधील ‘क्रांतिकारक संत’ म्हणणे संयुक्तिक ठरेल यात शंकाच नाही!



























































