
26/11रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बचावलेल्या 21 वर्षीय देविका रोटावन हिने हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता केली नसल्याचे तिने म्हटले आहे. आपल्या कुटुंबियांना राहण्यासाठी घर व पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाने तरतूद करावी अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.
26/11 च्या हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात देविका हिच्या उजव्या मांडीला गोळी लागली होती. केंद्र सरकार व राज्य सरकारने ईडब्लूएस स्कीम अंतर्गत तिला घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. आपले वडील व भावाला गरिबीमुळे घर चालवणे कठीण जात असून शासनाने राहण्यास घर द्यावे तसेच शिक्षणाचा खर्च उचलावा अशी विनंती तिने याचिकेद्वारे केली आहे.































































