मालाड दुर्घटना : गटारावरील झाकण काढणाऱ्यावर गुन्हा दाखल, अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मालाडमध्ये गटारात पडून दीड वर्षाचा मुलगा वाहून गेल्याच्या प्रकरणात दिंडोशी पोलीस ठाण्यात गटारावरील झाकण काढणाऱया अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत गटारावरील झाकण अज्ञाताने काढल्याचे फुटेज पालिका प्रशासनाच्या हाती लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही दिंडोशी पोलीस ठाण्यात पत्र दिले होते. याशिवाय या दुर्घटनेत सहा दिवसांनंतरही बेपत्ता असणाऱया दिव्यांशच्या वडिलांनीदेखील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गटाराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱयांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

सीसीटीव्ही फुटेज सांगतात…
1 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नाल्यावर झाकण होते, मात्र याच दिवशी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान 4.30 वाजता अज्ञात इसमाने नाल्यावरील झाकण काढले.
4 जुलै रोजी स्थानिकांनी संबंधित गटार प्लायवुडच्या झाकणाने तात्पुरती व्यवस्था केली.
6 जुलै रोजी अज्ञात इसमाने प्लाय काढून नाला पुन्हा उघडा केला.
10 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता दीड वर्षीय दिव्यांश या गटारात पडला.
पी-दक्षिणच्या सहायक आयुक्तांनी 12 जुलै रोजी दिंडोशी पोलीस ठाण्यात पत्र देऊन संबंधित दुर्घटना अज्ञाताने गटाराचे झाकण काढल्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे सांगून चौकशी करण्याच मागणी केली.

धारावीतील नाल्यात मुलगा बुडाला
धारावी झोपडपट्टीतील एका नाल्यात सात वर्षांचा मुलगा आज पडला. हा प्रकार कळताच नागरिकांनी मुलाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून शीव रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मुलाला मृत घोषित केले. सुमित मुन्नालाल जैसवार (7) हा धारावीतल्या राजीव गांधी नगरातील श्रीसंत साईनाथ वेल्फेअर सोसायटीत राहत होता. आज सुमित निसर्गउद्यानाजवळील खाडीच्या बाजूला खेळत असता तेथे असलेल्या उघडय़ा गटारात पडला. सुमित गटारात पडल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन अमितला बेशुद्धावस्थेत गटाराबाहेर काढले.