वडिलांवर अंत्यसंस्कार करून डॉक्टर कामावर रुजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याकडे घरातील जकळच्या कुटुंबीयातील सदस्याचे निधन झाल्यानंतर काही काळ काम करत नाही किंवा घरी आलेल्या नातेकाईकांना भेटत असतो. मात्र पुणे येथील डॉक्टर मुकुंद पेनुरकर यांनी या काळात रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची असून ती करणे गरजेचे असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. डॉ. पेनुरकर यांची आई आणि भाऊ दोघेही कोरोनाच्या आजाराविरोधात  हॉस्पिटलमध्ये झुंज देत होते, तर वडील रामदासराव पेनुरकर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार आटोपून 24 तासांच्या आत ते रुग्णालयात रुजू झाले आहेत. सध्या कोरोनाच्या उपचारात रुग्णांना, डॉक्टरांची नितांत गरज असताना वडील गेल्याचा शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा त्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य दिले आहे.

कर्वे रोडवरील संजीवन हॉस्पिटलमध्ये डॉ. पेनुरकर गेली दहा वर्षे रुग्णसेवा देत आहेत. ते औषधशास्त्र या विषयातील तज्ञ असून कोरोना साथीच्या  सुरुवातीपासून ते कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देत आहे. डॉ. पेनुरकर दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत असल्यामुळे आणि पुण्यातील संसर्गाचा धोका जास्त असल्यामुळे त्यांनी आईवडिलांना नागपूर येथील लहान भावाकडे पाठवले होते. त्यांचा लहान भाऊ नागपूर येथे सॉफ्टकेअर इंजिनीयर म्हणून कार्यरत आहे. 17  एप्रिलला त्यांच्या भावाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्यामुळे घरातील आईवडिलांना या आजाराची बाधा झाली. त्यामुळे तिघांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. पेनुरकर यांनी  सांगितले की, ‘त्या काळात नागपूरमध्ये ऑक्सिजन बेड्स मिळत नव्हते. अनेक मित्रांच्या सहकार्याने प्रयत्न केले, पण तिघांना एकत्रितपणे कुठे बेड्स मिळत नव्हते. मग शेवटी कार्डियाक ऍम्ब्युलन्स करून तिघांना पुणे येथे संजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतु दिवसागणिक वडिलांची तब्येत खालावत गेली आणि त्यांचे त्यातच निधन झाले.

  • 26 एप्रिल रोजी डॉ. पेनुरकर यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी एकटय़ानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांनी बहिणीला व काही नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून अंत्यसंस्कार दाखवले. यानंतर लगेच दुसऱया दिवशी डॉक्टर रुग्णसेवेसाठी हजर झाले. डॉ. पेनुरकर पुणे येथील फिजिशियन असोसिएशन ऑफ पुणे या संस्थेचे सेक्रेटरी आहेत.
  • ‘सध्या आमचे सर्व डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त असून अनेकवेळा त्यांना जवळच्या व्यक्तींची भेटही होत नाही. सध्याचा काळ खूप कठीण आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारापासून संरक्षणासाठी बाहेर पडू नये. बाहेर पडलात तर मास्क लावावा, लसीकरण करून घ्यावे. ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांना फारसा या संसर्गाचा त्रास होत नाही हे दिसून आले आहे.’
  • एका बाजूला वडिलांचे निधन झाले होते आणि दुसऱया बाजूला आई आणि भाऊ हॉस्पिटलमध्ये या आजाराविरोधात लढा देत होते. त्यांना जड अंतःकरणाने मी वडील गेल्याची बातमी दिली. माझे वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. वाईट काळात त्यांनी मला कधीच घरी थांबायला सांगितले नसते. आई आणि भावाची तब्येत आता बरी आहे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.