
पालिकेच्या जी/दक्षिण वरळी विभागातील पावसाळापूर्व कामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाकडे केली.
आदित्य ठाकरे यांनी आज जी/दक्षिण विभाग कार्यालयात पालिका अधिकाऱयांची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, जल निस्सारण व्यवस्था, संभाव्य पाणी तुंबणाऱया ठिकाणांवर उपाययोजना करा, रस्त्यांची कामे पूर्ण करा आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश या वेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देशही आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. या वेळी उपनेते आमदार सचिन अहीर, आमदार सुनील शिंदे, नगरसेवक निशिकांत शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पद्मजा चेंबूरकर, युवासेनेचे अभिजित पाटील आदी उपस्थित होते.























































