
साकेत, बाळकुम, कोलशेत येथे सुरू असलेला वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प वेळेत पूर्ण करा, असे आदेश ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आज दिले. कोलशेत येथील १ हजार ३०० मीटर पाथवेचे काम सध्या प्रगतीपथावर असून सुशोभीकरण, संरक्षण भिंत, उद्यान या कामांनाही गती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
प्रकल्प परिसरात मातीचा भराव टाकून जास्तीत जास्त वृक्षारोपण केले जाणार आहे. पार्किंग परिसर, सायकल ट्रॅक, हर्बल कॉर्नर, अॅम्फी थिएटर ही कामेदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आज या प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केली व कामाचा आढावा घेतला. या वेळी तांत्रिक अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल आदी उपस्थित होते.
अतिक्रमण झाल्यास कारवाई
ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाचे रक्षण करणे महत्त्वाचे असून तेथे अतिक्रमण झाल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संदीप माळवी यांनी दिले आहेत. कांदळवनाच्या परिसरात बेकायदा बांधकामे, भराव या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कांदळवन समितीदेखील स्थापन करण्यात आली असून आज त्याची बैठक घेण्यात आली.






























































