
किरकोळ वादातून चापट मारल्याने लोकलखाली आलेल्या कंडक्टरचा मृत्यू झाल्याची घटना सायन रेल्वे स्थानकात घडली. दिनेश राठोड असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश राठोड हा बेस्टमध्ये कंडक्टरचे काम करत होता. तीन दिवसांपूर्वी रात्री तो सायन स्थानकात आला तेव्हा त्याचा महिलेला हात लागला. त्यावरून दिनेशचे आणि महिलेचे भांडण झाले. भांडण झाल्यावर महिलेने दिनेशला छत्रीने मारहाण केली. मारहाणीचा प्रकार तिच्या नवऱयाच्या लक्षात आला. तिचा नवरा पुरुषाच्या डब्याच्या येथून महिला डब्याजवळ आला. त्याने दिनेशला चापट मारली. त्यानंतर ते नवरा-बायको तेथून निघून गेले. चापट मारल्याने दिनेश ट्रकमध्ये पडला. तो उठून वर यायचा प्रयत्न करत होता. त्याचदरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल स्थानकात आली. लोकलखाली आल्याने दिनेश गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती समजताच दादर रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी दिनेशला मृत घोषित केले. दादर रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील फुटेजची तपासणी केली तेव्हा दिनेशला चापटी मारल्याने तो ट्रकमध्ये पडल्याचे उघड झाले. दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. दादर रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक स्मिता ढाकणे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दीन शेख आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरून पोलिसांचे पथक धारावी येथे गेले. तेथे पोलिसांनी चौकशी करून त्या जोडप्याला ताब्यात घेऊन अटक केली.



























































