कर्नाटक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट

सामना ऑनलाईन, बंगळुरू

कर्नाटकातील शहरी मतदारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला झटका दिला आहे. 2709 वॉर्डांपैकी काँग्रेसला 982 जागांवर विजय मिळाला आहे. जनता दल निरपेक्ष अर्थात जेडीएसला 325 तर, भाजपला 929 जागा मिळाल्या आहेत.  तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. मात्र, निकालानंतर सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येणार आहेत. त्यामुळे भाजपची पीछेहाट झाली आहे.

मे महिन्यात बहुमत न मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला झटका बसला होता. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले. चार महिन्यांतच भाजपला दुसरा दणका बसला. शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आहे.

  • तीन महापालिका, 29 नगरपालिका, 52 नगर परिषदा आणि 20 नगर पंचायतींमध्ये ही निवडणूक झाली. 31 ऑगस्टला मतदान झाले.
  •  एकूण 2709 वॉर्डांमध्ये ही निवडणूक झाली. 8340 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
  •  2628 वॉर्डांमधील निकाल जाहीर झाले असून, काँग्रेस 982, भाजप 929, जेडीएस 325 वॉर्डामध्ये विजयी झाले आहेत.
  • कर्नाटकातील जनतेने पुन्हा एकदा भाजपचे ‘जुमले’ नाकारले आहेत. काँग्रेसवर विश्वास दाखवून शहरी मतदारांनी क्रमांक एकचा पक्ष बनविला आहे.- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात जेडीएस आणि काँग्रेसला यश आले आहे. निकालानंतर जेडीएस आणि काँग्रेस एकत्र येतील- एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान

काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडी सरकारमुळे भाजपची अपेक्षेप्रमाणे कामगिरी होऊ शकली नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल- बी. एस. येडीयुरप्पा, माजी मुख्यमंत्री 

काँग्रेस कार्यकर्त्यांवर अॅसिडहल्ला; 10 जखमी

कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू असून, तुमकूरमध्ये अशाच एका मिरवणुकीवर अॅसिड हल्ला झाला. यात काँग्रेसच्या उमेदवारासह 10 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तुमकूर नगरपालिकेत वॉर्ड क्रमांक 16 मध्ये काँग्रेसचे इनायततुल्ला खान हे विजयी झाले. त्यावेळी काढलेल्या मिरवणुकीत अॅसिड हल्ला झाला. जखमी 10 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सुधारत आहे. स्वच्छतागृहामध्ये वापरले जाणारे हे ऑसिड आहे. त्याची तीव्रता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.