
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपने प्रचंड आरडाओरडा केला. हा तपास केंद्रीय यंत्रणांकडेदेखील दिला, परंतु त्याचा रिपोर्ट सामान्यांसमोर आला नाही. भाजपने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर एक संपूर्ण निवडणूक काढली तरी सीबीआयचा रिपोर्ट अद्याप आला नाही, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपला लगावला आहे.
सुशांत सिंह प्रकरणात पुढे काय झाले? हे अद्याप देशवासीयांना माहिती नाही. सध्या केंद्रीय यंत्रणा सचिन वाझे या प्रकरणात उतरल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वास येत आहे. माझे मत आहे पोलीस यंत्रणेला त्यांचे काम करून द्यावे. कारण की हा संपूर्ण विषय खूप संवेदनशील आहे. राज्यातील विविध घडामोडींमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला आहे. या संपर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना किंवा पोलिसांना मोकळीक देण्यात यावी, असे जगताप यांनी सांगितले.
मुनगंटीवार यांच्या भविष्यवाणीबाबत जनतेत संशय
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकरणात सरकार अस्थिर कसे होईल याचा प्रयत्न भाजप करत आहे, परंतु मला खात्री आहे अशा संकटांनादेखील आमचे सरकार तोंड देईल. सुधीर मुनगंटीवार भविष्यवाणी करत आहेत याबाबत जनतेच्या मनात आता संशय आहे. वारंवार सरकार अस्थिर करण्यासाठी आकांडतांडव करायचे असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय असो किंवा एनआयए असो यांचा जो रिपोर्ट आहे तो आता समोर आणावा.






























































