
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्यातील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळालेले आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना बदलण्याची गरज नाही, अशी भूमिका आज काँग्रेसच्या मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमोर मांडली.
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबई दौऱयावर आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी ‘सल्ह्याद्री’ अतिथीगृहावर काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. प्रारंभी त्यांनी ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. प्रारंभी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर एच. के. पाटील यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व आमदारांशी चर्चा केली.
राज्यात काँग्रेसची घडी बसली आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत 5 महापालिका व 100 नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. शिवाय वर्षभरावर राज्यातील प्रमुख 15 महानगरपालिकांसह 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. अशा वेळी पक्षाचे नेतृत्व बदलणे फारसे फायदेशीर ठरणार नाही. दीड वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीत बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय स्थितीनंतर काँग्रेस सत्तेत आली. आताही सरकार व पक्षात चांगला समन्वय ठेवला आहे. सध्या आपण सत्तेत आहे याचा फायदा संघटनवाढीसाठी करून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आणखी दीड-दोन वर्षे नेतृत्व ठेवावे. मात्र, तरीही दिल्ली हायकमांड यांनी अंतिम निर्णय घ्यावा, अशी भूमिका बहुतांश मंत्र्यांनी एच. के. पाटील यांच्यासमोर मांडली.





























































