मोदी-शहांचा लोकशाही संपवण्याचा कट, मल्लिकार्जुन खरगे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरक्षेच्या मुद्दय़ावरून मोदी सरकारला जाब विचारणाऱया जवळपास 150 खासदारांचे निलंबन करण्याविरोधात आज शुक्रवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जोरदार एल्गार पुकारला. या वेळी मोठय़ा संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता उपस्थित होती. या वेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा सरकारवर जोरदार प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांनी लोकशाही आणि या देशाचे संविधान संपवण्याचा कट रचला आहे, असा घणाघात त्यांनी केला. तुम्ही सीबीआय, ईडीची भीती दाखवून कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही, आणखी जोमाने उभे राहू, असेही ते म्हणाले.

मी जेव्हा सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी उभा राहत होतो, तेव्हा कधीच मला संधी मिळाली नाही. देशात बलात्कार होतात, दलितांना चिरडले जाते, शेतकऱयांना, मजुरांना मारले जाते आणि संविधानाच्या ठिकऱया उडवल्या जातात आणि याबाबत जेव्हा मी प्रश्न विचारण्यासाठी उभा राहातो तेव्हा मलाच नोटीस बजावली जाते, ही नोटीस वाचण्याचीही परवानगी मला नसते, असा आरोपही खरगे यांनी केला. मग एका दलिताला बोलू दिले नाही असे मी म्हणू का, असा सवाल करतानाच घटनात्मक पदावर तुम्ही बसलात आणि रडताय, अशा शब्दांत खरगे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना सुनावले.

आंदोलनाप्रसंगी डावे पक्ष, डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, टीएमसी, जेएमएम, आरजेडीसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वमान्य जनता उपस्थित होती.

देशभरात जोरदार आंदोलन

खासदार निलंबनाविरोधात देशभरात विविध ठिकाणी विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. मुंबईसह दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, त्रिपुरा, नागालँड, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, मणिपूर, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान, पुदुचेरी, आसाम, पश्चिम बंगाल या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठय़ा संख्येने नेते-पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामन्य जनता सहभागी झाली होती.

लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ अँटॉप हिल येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची केंद्र सरकारच्या हिटलरशाहीविरोधात घोषणाबाजी केली.