नोटाबंदी, टाळेबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुका कधी सुधारणार? काँग्रेस-राष्ट्रवादीचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पबचत योजनांवरील व्याजदरकपातीचा निर्णय चुकून घेतल्याचे सांगत यू-टर्न करणाऱया केंद्र सरकारवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही जोरदार निशाणा साधला आहे. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघडय़ा डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करीत ‘गेल्या पाच वर्षांपासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघडय़ा डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

पेट्रोल–डिझेल दरवाढही मागे घ्यावी

‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरवला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल-डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढदेखील मागे घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

फाइलवर निर्णय झाला असणार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका करताना ‘एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो, तो असाच होत नाही. फाइलवर निर्णय झाला असेल. पाच राज्यांच्या निवडणुका बघून त्यात फटका बसेल या भीतीने हा निर्णय मागे घेतला. निवडणुकांनंतर पुन्हा हा निर्णय लागू केला जाईल,’ असे सांगितले.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माघार

‘नजरचूक वगैरे काही नाही! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु आज 1 एप्रिल आहे. हे एप्रिल फूल पण असू शकतं. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो.’ असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.