राम मंदिराला काँग्रेसचाच अडथळा! सत्ता आणि बहुमत असलेल्या मोदींचा आश्चर्यजनक दावा

21

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राम मंदिर निर्माणामध्ये काँग्रेसच अडथळा निर्माण करत असल्याचा आश्चर्यजनक दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतील रामलीला मैदानात भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समारोपाचे भाषण करतेवेळी नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे निर्माण का होऊ शकले नाही याचे उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सध्या राम मंदिराबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. काँग्रेस त्यांच्या वकिलांच्याद्वारे न्याय प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे असं मोदी म्हणाले आहेत. काँग्रेसने सरन्यायाधीशांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग आणण्याचाही प्रयत्न केला होता आणि काँग्रेसची राम मंदिर व्हावं अशी इच्छाच नसल्याने त्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

मोदी सरकारपुढे राम मंदिर निर्माणासाठी अध्यादेश काढण्याचा सहसोपा मार्ग उपलब्ध होता. मात्र असं न करता मोदी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायप्रक्रियेद्वारेच हा मुद्दा सोडवला जाईल असं सांगितलं होतं. शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी विधेयक आणावे अशी मागणी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप सारख्या हिंदुत्ववादी संघटनांनीही शिवसेनेची ही मागणी उचलून धरत विधेयक आणण्याची मागणी केली होती. ही मागणी मोदी यांनी धुडकावून लावत न्यायालयाद्वारे हा मुद्दा सोडवण्याचा हट्ट कायम ठेवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या