
पिण्याचे पाणी मिळणे ही मनमाडकरांच्या जिव्हाळ्याची बाब आहे – शॉपिंग सेंटर बांधणे नव्हे ही लोकांची भावना लक्षात घेऊन काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करंजवण पाणी योजनेच्या तांत्रिक मंजूरी व निधीसाठी यापुढे आमरण उपोषणासारखे हत्यार उपसून आंदोलन अधिक तीव्र करावे असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांनी येथे दिला.
येथील एकात्मता चौकात मनमाड शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष अफजलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनपासून एकात्मता चौकापर्यंत मोर्चा काढला व तेथे तीव्र आंदोलन व निदर्शने केली. त्यात प्रत्यक्ष सहभाग घेत आपण ही मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांपुढे तसेच संपर्कं मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे प्रकर्षाने मांडू व ती पूर्ण कशी होईल याचा पाठपुरावा करू असे प्रतिपादनही कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी यावेळी केले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तुषार शेवाळे यांचाही यावेळी सहभाग होता.
शहर काँग्रेसतर्फे करंजवण पाणी पुरवठा योजनेसाठीचा निधी पालिकेच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून द्यावा व बेकायदेशीररित्या सुरू असलेले आययुडीपी विभागातील शॉपिंग सेंटरचे काम ताबडतोब थांबवावे अशी मागणी मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अफजलभाई शेख यांनी यावेळी बोलतांनी केली. माजी नगराध्यक्ष रहेमान शाह यांनीही शॉपिंग सेंटरची कोणतीही गरज नसतांना ते बांधले जात असल्याने तो या निधीचा अपव्यय आहे याउलट निधीअभावी करंजवण योजनेस तांत्रिक मंजूरी मिळाली नाही त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले व तशी मागणी करणारे निवेदन कार्याध्यक्ष हुसेन यांना व नगरपालिकेला देण्यात आले. मनमाड च्या जनतेला कायम स्वरूपी पाणी मिळण्यासाठी ठोस योजना करंजवणच्या रूपाने साकारत असून या योजनेच्या तांत्रिक मंजूरीसाठी चौदाव्या वित्त आयोगातून दोन कोटी रूपये देण्यात यावेत ही शहर काँग्रेसची मागणी योग्य असून त्याचा आपण वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करू, असेही कार्याध्यक्ष हुसेन म्हणाले.
काँग्रेसचे झेंडे घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टनसिंग ठेवीत व सॅनिटायजरचा वापर करून या धरणे आंदोलनात शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.



























































