
गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा अंदाज वर्तवला गेल्यानंतर काँग्रेस लगेच अॅलर्ट मोडवर आला आहे. निकालाआधी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू करून आमदार पळवापळवीच्या शक्यतेने काँग्रेसने सर्व 37 उमेदवारांना दोन हॉटेलमध्ये शिफ्ट केले आहे. मागच्या निवडणुकीत 17 उमेदवार निवडून येऊनही सरकार बनवता आले नाही त्याचा धडा घेत काँग्रेसने आता पुरेपूर खबरदारी घेतल्याचे दिसते.
सोमवारी विविध वृत्तवाहिन्यांनी देशातील पाचही विधानसभा निवडणुकांबाबत एक्झीट पोलमधून अंदाज वर्तवला. गोव्यात त्रिशंकू विधानसभेचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी सत्तास्थापनेच्या गणितांची जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच काँग्रेसने सर्व 37 उमेदवारांना दोन हॉटेलमध्ये शिफ्ट केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. एका नेत्याच्या बर्थ डे पार्टीसाठी सर्व उमेदवारांना निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला 100 टक्के खात्री आहे. आमचे सगळे उमेदवार जिंकून येतील आणि ते गुरुवारी आपल्या नेत्याचे नाव निश्चित करतील. आमचा एकही आमदार कोणीही पह्डू शकत नाही, असा दावा चिदंबरम यांनी मंगळवारी केला.




























































