
सामना ऑनलाईन, लातूर
काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनंतर आता माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी देशातील जनतेला आणखी एक आश्वासन दिलंय. सत्तेत आलो जिंकलो तर देशातील सगळ्या नद्या 300 ते 400 मीटर खोल करू असे ते म्हणाले आहेत. हे आश्वासन म्हणजे एक गाजर असल्याची टीका त्यांच्यावर व्हायला लागली असून या गाजरबाज विधानाची सध्या लातूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना पाटील म्हणाले की देशात काँग्रेसची देशात सत्ता आल्यानंतर गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, कृष्णा, कावेरी यासह सगळ्या नद्यांचे पात्र ३०० ते ४०० मीटरपर्यंत खोल केले जाईल आणि पावसाचा एकही थेंब समुद्रात जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल. असे करून आपण देशातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून असं आश्वासन पाटील यांनी दिलं आहे.
2008 साली सप्टेंबर महिन्यात दिल्लीमध्ये स्फोट झाले होते. हे स्फोट झाले तेव्हा शिवराज पाटील हे केंद्रीय गृहमंत्री होते. या स्फोटांच्या दिवशी शिवराज पाटील यांनी तीन वेळा पोशाख बदलल्याचे माध्यमांनी कॅमेऱ्यामध्ये टीपले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची भयंकर झोड उठली होती. ते अकार्यक्षम असल्याचीही त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. या टीकेनंतरही काँग्रेसने त्यांच्यावर काहीही कारवाई केली नव्हती. अखेर मुंबईत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांची गच्छंती करण्यात आली आणि त्यांच्याजागी पी.चिदंबरम यांना गृहमंत्रीपदी बसवण्यात आले.




























































