अक्कलदाढ व मेंदूचा काही संबंध आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कल दाढ ही जबड्यातील सर्वात शेवटच्या ठिकाणी येते. एकूण 4 अक्कल दाढ आपल्याला असतात. ही दाढ उगवताना देखिल सर्वात उशीरा म्हणजे शेवटी उगवते. या दाढेला इंग्लिश भाषेत (wisdom teeth) विसडम टूथ म्हणतात. विसडम चा अर्थ शहाणपणा असा होतो याला पर्यायी शब्द अक्कल घेऊ शकतो.

साधारणतः वयाच्या 18-25 वर्ष असताना अक्कल दाढ तोंडात उगवते. आपल्याकडे 18 वर्ष वय झालं म्हणजे त्या व्यक्तीला अक्कल / शहाणपण आलंय असं गृहीत धरलेलं असतं, म्हणुन बरेचसे अधिकार वय वर्ष 18-25 असताना दिले जातात.

आयुष्यात अक्कल येण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा लोकांचा त्रास, वाईट वागणूक, धोके सहन करावे लागतात. म्हणजेच बऱ्याच वेदना सहन केल्यानंतर आपल्याला अक्कल येते असं म्हणता येईल. अक्कल दाढ उगवताना देखिल अतिशय त्रास होतो. कधीकधी हा त्रास असह्य करणारा असतो. म्हणूनच या उगवताना वेदना देणाऱ्या दाढेला अक्कल दाढ म्हणतात.

अक्कल दाढ येताना त्रास होतो याचं कारण हे आहे की, मानवी उत्क्रांतीत जबड्याचा आकार छोटा झाला पण दातांची संख्या तिच राहिली. म्हणुन शेवटची दाढ येण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही त्यामुळे ती जबड्याच्या हाडाला छेदून वर येण्याचा प्रयत्न करत असते .

वयाचा आणि अक्कलेचा तितकासा काही संबंध नसतो. काही लोकांना कमी वयात जास्त अनुभव मिळल्याने त्यांना अक्कलदाढ येण्यापूर्वीच अक्कल येते .

अक्कल दाढ आलीय म्हणजे त्या व्यक्तीला वागण्याची अक्कल आलीय व ज्याला अक्कल दाढ आली नाही तो अक्कलशून्य आहे असं म्हणणं चुक आहे. अक्कल दाढ काढून टाकली म्हणजे अक्कल गेली असं देखिल नाही. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना विशाखा देशमुख यांनी ही माहिती दिली.