
१४ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘कुली’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ चित्रपटाशी टक्कर होऊनही, रजनीकांतचा कुली बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे.
चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, तरीही तो जोरदार कामगिरी करत आहे आणि बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला कमावत आहे. रजनीकांतचा ‘कुली’ हा चित्रपट केवळ ७२ तासांत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा कॉलीवूड चित्रपट बनला आहे. फक्त तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५९ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
‘कुली’ने पहिल्या दिवशी ६५ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी मात्र १५.७७ टक्क्यांनी घसरून ५४.७५ कोटी रुपये झाली होती. तिसऱ्या दिवशी ‘कुली’ने २७.८५ टक्क्यांनी घटून ३९.५ कोटी रुपये कमावले. सॅकॅनिल्कच्या माहितीनुसार, ‘कुली’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी ३५ कोटी रुपये कमावले आहेत. कुलीची एकूण चार दिवसांची कमाई १९४.२५ कोटी रुपये झाली आहे.
रजनीकांतच्या या चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कमाईत निश्चितच घट झाली आहे. तरीही हा चित्रपट २०० कोटींचा चित्रपट बनण्यापासून फक्त ५.७५ कोटी दूर आहे. असा अंदाज आहे की, हा चित्रपट पहिल्या सोमवारी हा आकडा ओलांडेल आणि एक नवीन विक्रम करेल.
लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात नागार्जुन, श्रुती हासन, उपेंद्र, सौबिन शाहीर आणि सत्यराज यांच्याही भूमिका आहेत. आमिर खान एका छोटीशी भूमिका साकारत आहे. समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असूनही, चाहत्यांनी मात्र कुलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.