कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटना, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूतील कुन्नूरमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले एकमेव हवाई अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर बंगळुरूमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. हवाई दलाने ट्विट करत याची माहिती दिली.

तामीळनाडूतील कुन्नूरमधील 8 डिसेंबरला झालेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र या दुर्दैवी अपघातात वरुण सिंह बचावले होते. त्यांच्यावर तामीळनाडूतील लष्कराच्या वेलिंग्टन रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथे हलवण्यात आले. ते या अपघातातून वाचावेत यासाठी देशभर प्रार्थना सुरू होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दिवसातून दोन वेळा त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत होते. मात्र दुर्दैवाने आज आठव्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंह हे उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील मूळ रहिवासी असून त्यांचे वडील हेही हवाई दलातील आर्मी एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये होते तर लहान भाऊ नौदलात लेफ्टनंट कमांडर आहे. वरुण सिंह पत्नी आणि मुलांसह वेलिंग्टनमध्ये राहायला होते.

लोकवस्तीमध्ये लढाऊ विमान कोसळू दिले नाही

वरुण सिंह 10 हजार फुटांवरून तेजस हे लढाऊ विमान उडवताना त्यात तांत्रिक अडचणी आल्या. लोकवस्तीवर हे विमान कोसळून मोठी जीवितहानी होण्याचा धोका होता. अशा वेळी सुरक्षितपणे बाहेर पडून आपले प्राण वाचवणे सिंह यांना शक्य होते. मात्र त्यांनी अशा आणीबाणीच्या वेळीही तेजसमधून बाहेर न पडता तेजस सुरक्षितपणे खाली उतरवले. स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना 2021 च्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना हवाई दलाने ‘सर्वोत्तम पायलट’ पुरस्काराने सन्मानित केले होते.