
कोविड-19 विषाणू संसर्गाचा पहिल्या व दुसऱया लाटेतील फैलाव नियंत्रित केल्यानंतर आणि कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविडची संभाव्य तिसरी लाट आलीच तर ती तातडीने रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये आता भर पडली आहे ती कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या (एण्टीबॉडीज कॉकटेल) उपचार पद्धतीची. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले असून हा प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरला आहे. कारण, हे मिश्रित औषध दिल्यानंतर फक्त एकाच (0.5 टक्के) रुग्णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्यू दरामध्ये तब्बल 70 टक्के घट झाली आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन कमी होवून आता 5 ते 6 दिवसांवर आला आहे.
कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेसाठी तयारीचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने रुग्णशय्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयू सह रुग्णशय्या देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. ठिकठिकाणी रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभे केले जात आहेत. एका बाजूला सेवा-सुविधा वाढवतानाच तिसरी लाट येवूच नये अथवा आली तर ती वेळीच रोखता यावी, यासाठी शक्य ती सर्व कार्यवाही केली जात आहे.
बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावेत आणि मागील दीड वर्षे सातत्याने कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये अहोरात्र राबत असलेल्या वैद्यकीय मनुष्यबळावरील ताण हलका व्हावा, म्हणून निरनिराळ्या औषधोपचारांची चाचपणी महानगरपालिका आरोग्य प्रशासनाकडून केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविड बाधितांवर उपचारांसाठी करण्यात आला आहे. हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह राज्याचे कुटुंब कल्याण आयुक्त रामास्वामी यांच्या पुढाकाराने ही नवीन औषधोपचार पद्धती स्वीकारण्यात आली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार व अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्या निर्देशाखाली त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोविड बाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्ये नोव्हेंबर 2020 पासून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोविड बाधित झाल्यानंतर त्यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्ये अलीकडेच म्हणजे दिनांक 10 मे 2021 रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation) या औषधांची नोंदणी होवून भारताचे औषधी महानियंत्रक (Drugs Controller General of India) यांनी त्यास मान्यता दिली आहे.
कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब ही प्रतिपिंड औषधी (antibodies medicine) आहेत. या दोन्ही औषधांचा मिश्रित (cocktail) वापर करुन कोविड बाधितांवर उपचार केले जाऊ शकतात. ज्यांचे वय 12 वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन 40 किलोपेक्षा जास्त आहे अशा बाधित रुग्णांना हे औषध दिले जाते. सौम्य ते मध्यम (mild to moderate) स्वरुपात ज्यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. महत्त्वाचे म्हणजे मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्यासारखे श्वसनाचे इतर तीव्र आजार, उच्च रक्तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्याधी इत्यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्य होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने ही मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभी सेव्हन हिल्स रुग्णालयात राबविली आहे. आजवर 212 कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यात आले. पैकी 199 रुग्णांचे उपचारअंती निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या 199 रुग्णांमध्ये 18 ते 45 वर्ष वयोगटातील 101 रुग्ण, 45 ते 59 वर्ष वयोगटातील 45 रुग्ण तर 60 वर्ष वयोगटावरील 53 रुग्णांचा समावेश आहे. एकूण 199 पैकी 74 जणांना किमान एक तरी सहव्याधी (co-morbidity) आहे.
हे सर्व 199 रुग्ण सौम्य ते मध्यम बाधा या गटातीलच होते. उपचार सुरु करतेवेळी या 199 बाधितांपैकी 179 जणांना ताप, 158 जणांना तापासह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्याचा त्रास होत होता. तसेच 4 रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करावा लागणार होता. एचआरसीटी चाचणीनुसार वर्गीकरणाचा विचार करता रुग्णांचा सरासरी एचआरसीटी स्कोअर 25 पैकी 7 ते 8 इतका होता. सर्वाधिक एचआरसीटी स्कोअर 25 पैकी 11 इतका होता.
उपचार अंती प्राप्त निष्कर्षांचा विचार करता, कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रण देण्यात आलेल्या बाधितांना रुग्णालयात 5 ते 6 दिवसच उपचार घ्यावे लागले. त्या तुलनेत इतर औषधी घेतलेल्या, पहिल्या व दुसऱया लाटेतील रुग्णांना 13 ते 14 दिवस रुग्णालयात राहावे लागत होते. रुग्ण लवकर बरे होत असले तरी औषधांचे परिमाण अभ्यासण्यासाठी तसेच रुग्णांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवता यावी, यासाठी त्यांना अधिकचा काळ रुग्णालयात ठेवण्यात आले.
निरीक्षण अंती असे लक्षात आले की, मिश्रित औषध दिल्यानंतर अवघ्या 48 तासांतच रुग्णांना ताप येणे थांबले. 199 पैकी फक्त एकाच व्यक्तीला पुढे प्राणवायू पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे 0.5 टक्के आहे. कोविड बाधितांना एरवी प्राणवायूची भासणारी निकड पाहता, ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. कारण पहिल्या व दुसऱया लाटेमध्ये किमान 20 टक्के रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत होता. तर 5 टक्के रुग्णांना अतिदक्षता (आयसीयू) उपचार पुरवावे लागत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही रुग्णावर या मिश्रित औषधांचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्टस्) आढळलेले नाहीत. तसेच मृत्यूंचे प्रमाण देखील तब्बल 70 टक्क्यांनी घटले आहे.
सदर मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्या कालावधीत संबंधित रुग्णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्णालयात दाखल करुन न घेता, बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) पद्धतीने देखील हे औषध देणे शक्य आहे. रेमडेसिविर सारखी औषधं आणि स्टेरॉईडचा उपयोग टाळून हे मिश्रित औषध देणे शक्य असल्याने रुग्णांना खऱया अर्थाने दिलासा मिळतो आहे. रुग्णालयात दाखल होण्याची गरज टाळून, प्राणवायू पुरवठा आणि इतर महागड्या औषधोपचारांची आवश्यकता भासत नसल्याने सदर मिश्रित औषधोपचार आर्थिकदृष्ट्या देखील रुग्णांना फायदेशीर ठरणारे आहेत. तर वैद्यकीय मनुष्यबळाचा विचार करता, रुग्णाला ओपीडी तत्वावर उपचार पुरवणे शक्य असल्याने आणि रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होत असल्याने डॉक्टरांवरील कामकाजाचा ताणही निवळण्यास मदत होणार आहे.
कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर एण्टीबॉडीज कॉकटेलचा हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे प्राथमिक निष्कर्ष हाती आल्याने महानगरपालिका प्रशासनाने या औषधांचा वापर करता यावा यासाठी पुरेशी तयारी केली आहे. कोविडचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवा-सुविधा सुसज्ज असताना, तसेच लसीकरणाला वेग दिल्यानंतर या नवीन औषधोपचार पद्धतीमुळे मुंबईकर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.































































