
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गणेशोत्सवाचा आनंद अनुभवता यावा यासाठी कोरोना सेंटरमध्ये बाप्पाच्या आरतीचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील वनिता समाज मंडळमध्ये असलेल्या कोरोना सेंटरमध्ये पालिकेच्या जी/उत्तर विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लक्षणे नसलेले किंवा कमी लक्षणे असणारे कोरोना रुग्ण अधिक जलदपणे बरे व्हावेत, यासाठी जी/उत्तर विभागाने साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचाराबरोबर आतापर्यंत योग, ध्यानधारणा, संगीत, गीतगायन, नृत्य, महापुरुषांची व्याख्याने असे अनोखे उपक्रम सुरू केले. शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी असे उपक्रम खूपच उपयोगी पडतात, असा अनुभव असल्यामुळेच आता कोरोना रुग्णांनाही गणेशोत्सवाचे वातावरण कोरोना सेंटरमध्ये अनुभवता यावे, यासाठी गणेशमूर्तीची स्थापना न करता दरदिवशी बाप्पाच्या आरतीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांना गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद मिळावा, महाराष्ट्रातील सर्वात मोठया उत्सवापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये, यासाठी रोज संध्याकाळी बाप्पाची आरती करण्यात येते. यात कोरोना सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्यसेवकही भाग घेतात. त्यामुळे रुग्णांचे मानसिक बळही वाढेल आणि रुग्ण अधिक लवकर बरेही होतील.’
– डॉ. श्रुतिका गुरव, साहाय्यक आरोग्य अधिकारी, वनिता समाज मंडळ































































