मुख्यमंत्र्यांकडून आशासेविकांना मानाचा मुजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 70 हजार आशासेविकांनी कोरोना काळात ‘आशा’ शब्दाला साजेसे काम केले आहे. आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका मुलांना असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ही लाट रोखण्यासाठी आशासेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशासेविकांची जबाबदारी’ या विषयावर बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशासेविकांशी संवाद साधला. या वेबिनारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे मार्गदर्शन केले.

कुपोषणामुळे बालमृत्यू नको

कोरोनाव्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे. त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर गावातील वाडय़ा-वस्त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा, असे त्यांनी सांगितले.

तिसऱया लाटेत महत्त्वाची भूमिका आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वतःची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसरणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे. त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राचे कुटुंब आपण तळहाताच्या फोडासारखे जपत आला आहात. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशाताईंची भूमिका महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांनी सोप्या भाषेत कोरोना प्रतिबंध व उपचार, लहान मुलांसाठी पौष्टिक आहार, मानसिक आजार याविषयी मार्गदर्शन केले. या परिषदेत राज्यभरातील सुमारे 70 हजार आशासेविका या ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुरबाड येथील रोहिणी भोंदिवले, नंदुरबार जिह्यातील पातोंडा येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भूमिका बंजारी, हिंगोली येथील सुनीता कुरवडे या आशासेविकांनी मनोगत व्यक्त केले.

‘आशा’ शब्दाला साजेसे काम

आशासेविकांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले. राज्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. आपल्याला जगवते ती आपल्यातली ‘आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेसे काम आशाताई करीत आहेत. ते असेच कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.