कोरोनाचा फटका कॉमेडी क्वीनला, भारतीच्या मानधनात 70 टक्के कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. अगदी कलाकारदेखील यातून सुटू शकलेले नाहीत. शूटिंग ठप्प असल्याने अनेक कलाकारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. छोटय़ा पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह हिलादेखील कोरोनाची झळ बसली आहे. आपल्या मानधनात तब्बल 70 टक्के कपात करण्यात आल्याची कबुली तिने दिली आहे.

भारती तब्बल सात महिन्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून पदार्पण करतेय. अर्थात छोटय़ा पडद्यावर पदार्पण करताना तिला अर्ध्या पैशांवर पाणी सोडावे लागले आहे. निर्मात्यांनी भारतीच्या मानधनात 50 टक्के कपात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये भारती दिसत असली तरी तिच्या मानधनात तब्बल 70 टक्के कपात करण्यात आली आहे.

याबाबत भारतीने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ‘‘मानधन कमी होणार असल्याचे समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. मलाही वाईट वाटतंय. मी निर्मात्यांशी मानधन कपातीवर बोलले आहे. पण जेव्हा लक्षात आलं की, आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. अनेक शोज बंद झाले आहेत. जे शोज सुरू आहेत त्यांना स्पॉन्सर मिळत नाहीत. त्यामुळे सर्वांनीच ही परिस्थिती समजून घ्यायला हवी.’’