#coronaeffect सिक्कीममध्ये विदेशी पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनसह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या विषाणूचा हल्ला आता अर्थ आणि पर्यटन या घटकांनाही बसू लागला आहे. अनेक देशांनी चिनी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या पर्यटन क्षेत्रावर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. कारण आता देशांसह राज्येही पर्यटकांना येण्यास रोखत आहेत. पर्यटकांवर बंदी घालणाऱ्या राज्यांमध्ये सिक्कीम या राज्याचाही आता समावेश झाला आहे.

मार्च-एप्रिल हा उत्तर दिशेकडील राज्यांचा पर्यटनाचा मोसम असतो. विशेषतः हिमालय पर्वतराजीत वसलेल्या राज्यांमध्ये यावेळी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. त्यातीलच एक प्रसिद्ध ठिकाण असलेल्या सिक्कीम आणि दार्जिलिंग ही पर्यटकांची विशेष आवडीची ठिकाणं आहेत. पण, सिक्कीम या राज्याच्या सीमा चीन, तिबेट आणि भूतान या देशांना लागून आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या भीतीने सिक्कीमने पर्यटकांवरील निर्बंध अजूनच कडक केले आहेत. तर नाथू ला या चीनच्या दिशेकडील भागातून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली आहे.

सिक्कीमच्या गृहविभागाने गुरुवारी या संबंधित एक नोटीस जारी केली आहे. त्यानुसार अंतर्गत पर्यटनासाठी विदेशी पर्यटकांना लागणाऱ्या परवानगीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध चीन, भूतान आणि तिबेटमधून येणाऱ्या पर्यटकांसाठीही आहेत. या निर्बंधांमुळे सिक्कीम या राज्याच्या पर्यटनावर परिणाम होणार आहे. कारण, या निर्बंधांनंतर अनेक देशांमधून येऊ घातलेल्या सहली रद्द करण्यात आल्या आहेत. सहली रद्द होण्याचं प्रमाण पुढेही सुरू राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाने संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेला आहे. केरळमध्ये शिरकाव केलेल्या या विषाणूने हळूहळू अनेक राज्यांत घुसखोरी केली आहे. देशभरात आतापर्यंत 30 जणांना या भयानक विषाणूची लागण झाली असून विषाणूचा फैलाव वेळीच रोखायचा कसा, असा यक्षप्रश्न सरकारी यंत्रणांपुढे उभा ठाकला आहे.

हिंदुस्थानात कोरोनाच्या फैलावाचा धोका वाढल्याने केंद्र सरकारने आपत्कालीन उपाययोजनांसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. देशभरात आतापर्यंत कोरोनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. त्यात 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात विषाणूच्या चाचणीसाठी 15 प्रयोगशाळा बनवल्या असून आणखी 19 प्रयोगशाळा तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था केली जात आहे.