सेटवर कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन, मराठी चित्रपट महामंडळ नेमणार भरारी पथक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे तीन महिने रखडलेले चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मात्र अनेक निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसकडून केंद्र आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोनासंबंधी नियमावलीचे उल्लंघन होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर या नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेतला असून लवकरच भरारी पथकांची नेमणूक करणार आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. याबाबत राजेभोसले म्हणाले, कलाकारांची उपासमार होऊ नये यासाठी  शासनाकडून सशर्त शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. तरीही काही निर्माते, प्रॉडक्शन हाऊसकडून नियमावलीचे उल्लंघन होत असल्याने सेटवर देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसतेय. महामंडळ राज्यभरात भरारी पथक नेमणार असून ते शासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन होतेय की नाही याची पाहणी करणार आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन होताना दिसले तर त्वरित पोलीसांच्या मदतीने शूटींग थांबवले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.