ठाणेकरांनो सावधान… काळजी घ्या! कोरोना फास आवळतोय; मुंब्य्रात तरुणाचा बळी, तीन दिवसांत आढळले दहा रुग्ण

कोरोनाची बाधा झालेल्या एका तरुणाचा आज कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झाला. मुंब्रा येथे राहणाऱ्या या तरुणाला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्याला शुक्रवारी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. शहरात गेल्या तीन दिवसांत कोरोनाची बाधा झालेले १० रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी तातडीने विभागप्रमुखांची बैठक घेऊन कोरोना रुग्णांची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी सर्वच रुग्णालयांनी सतर्क राहावे असे निर्देश दिले होते. ही बैठक होऊन एक दिवसही उलटला नाही तोच आज सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका २१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मुंब्रा येथील या २१ वर्षीय तरुणाला वयाच्या सातव्या वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. शुक्रवारी त्याला कुटुंबीयांनी कळवा रुग्णालयात दाखल केले होते. मधुमेह आणि अॅसिडोसिसच्या गुंतागुंतीमुळे उपचार करणे अवघड होते. त्यातच या तरुणाच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आज उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले.

काही रुग्णांवर घरीच उपचार
ठाणे शहरात सध्या कोरोनाची बाधा झालेले १० रुग्ण आहेत. त्यापैकी काही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. कळवा रुग्णालयातील कोरोनाच्या विशेष कक्षात सध्या दोन रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचे वाढत चाललेले रुग्ण आणि तरुणाचा गेलेला बळी यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने आणि सर्वच रुग्णालयांनी सतर्क राहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. शहरात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची पळापळ उडाली आहे.