कोरोनाबाधित रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये आज शुक्रवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रुग्णालय प्रशासन यावेळी नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, रामलिंग महादेव सानप (35, रा.तांदळ्याचीवाडी ता.बीड) असे मयत रुग्णाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या केल्याने त्याचे कुटुंबीय व गावकरी हादरून गेले. दरम्यान मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्या केलेला तरुण ऊसतोड कामगार म्हणून काम करत होता.

त्याने रुग्णालयात आत्महत्या करतानाचे दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यावेळी कुणाचेही लक्ष का नव्हते? असा प्रश्न उपस्थित होत असून या घटनेने खासगी रुग्णालयातील बेजबाबदारपणाही समोर आला आहे. माहिती मिळताच घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तणावातून या रुग्णाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वंर्तविला आहे.