कोरोनामुळे केलवड गावाला आली बरकत, नवी बाजारपेठ निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला होता. या लाटेने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आर्थिक नुकसानही झाले; परंतु राहाता तालुक्यातील केलवड गावाला मात्र बरकत आली आहे. या गावात कोरोनामुळे नवीन बाजारपेठ निर्माण झाल्याने केलवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाने अनेक ठिकाणी काही दुकाने, काही हॉटेल्स गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. इतर व्यवसायांना कोरोनाचा फटका बसला आहे. शिर्डीसारख्या तीर्थक्षेत्राच्या हॉटेल व्यावसायिक व अन्य व्यवसायांना कोटय़वधीचा फटका बसला. अशाही अवस्थेत केलवडसारख्या जिरायती टापूतील गावांत मात्र काहीसे दिलासादायक चित्र उभे राहिले आहे.

जिरायती टापूतील काही गावांमधील ग्रामस्थांना भाजीपाला घेण्यासाठीही राहाता येथे जावे लागत होते. केलवडही त्याला अपवाद नसायचे. भाजीपाला, कपडे खरेदी, तसेच इतर आठवडा बाजारासाठी जावे लागत असे. कोरोनाच्या काळात राहाता येथील बाजारपेठेवर परिणाम झाला. कडक निर्बंधामुळे भाजीपाला व इतर खरेदीही करणे अवघड बनले होते. त्यामुळे गावातल्या गावात भाजीपाला विक्रेते तयार झाले. त्याचाच परिणाम म्हणून केलवड येथे सुरुवातीला भाजीपाल्याची दुकाने थाटली गेली. दररोज ताजा भाजीपाला मिळू लागल्याने राहात्याकडे जाणारे ग्राहक मंदावले. परिणामी भाजीपाल्याच्या मागणीवरून विक्रेत्यांची संख्या वाढली. त्यानंतर खाद्यपदार्थांची दोन दुकाने आली.

विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील केलवडच्या चौफुलीवर बाजारपेठ फुलली. दवाखाने अद्ययावत झाले. रक्त, लघवी तपासणीची लॅब सुरू झाली. फळांची दुकाने, कटलरी, मेडिकल दुकानांमध्ये भर पडली. केलवडकडे येणारे सर्व रस्ते चकाचक असल्याने व काकडी विमानतळापासून अवघे तीन किलोमीटर हे गाव असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर वाढला. एरव्ही उन्हाळ्यात भर दुपारी रस्त्यावर चिटपाखरू न दिसणाऱ्या गावाला गावपण आले. गावाजवळील ओढय़ावर पूल उभा राहिला. डांबरी रस्त्यांनी, बायपासने गावाच्या वैभवात भर पडली आहे.