
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अत्यवस्थ रुग्णांना बेडची कमतरता पडू नये यासाठी मुंबईतील सर्व ‘आयसीयू’ बेड पालिकेने ताब्यात घेतले आहेत. शिवाय खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेशही पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
विविध रुग्णालयांत 20 हजार बेडस् वाढवण्यात येणार असून यापुढे पालिकेच्या 24 प्रभागांत असणाऱया ‘वॉर्ड वॉर रूम’च्या माध्यमातूनच कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, तर राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा पुरवठा कायम राहण्यासाठी वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत.
खासगी रुग्णालयांतील बेड सरकारी दर पत्रकाप्रमाणे उपलब्ध करून देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईत 10 फेब्रुवारी ते 30 मार्च या 48 दिवसांत एकूण 85 हजार रुग्ण आढळले. यात 69 हजार 500 रुग्ण हे लक्षणे नसलेले बाधित असल्याने त्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले. उर्वरित 15 हजार 500 रुग्णांमध्येच लक्षणे आढळली. यातील केवळ 8 हजार रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. इतरांना सौम्य लक्षणे असल्याने औषधोपचाराने ते बरे झाले. सद्यस्थितीत मुंबईत कोविड रुग्णांसाठी राखीव असलेल्या बेडपैकी सुमारे 3 हजार रुग्णशय्या रिक्त आहेत. यात खासगी रुग्णालयातील 450 बेडचाही समावेश आहे. शिवाय बेडची संख्या वाढवण्यासाठी जंम्बो कोविड सेंटर्ससह, कोविड केअर सेंटर्समधील सर्व बेड कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईत बेडची कमतरता भासणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
आयुक्तांनी घेतला पहिला डोस
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना रोखण्यासाठी लस महत्त्वाची असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी लस घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. बीकेसी लसीकरण पेंद्र देशातील सर्वाधिक लसीकरण झालेले ठरल्याचे सांगताना अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे व त्यांच्या सहकार्यांचे आयुक्तांनी कौतुकही केले.
असे वाढवणार बेड
सध्याची 13 हजार बेडची क्षमता 7 हजारांनी वाढवून ती 20 हजार करण्यात येईल. दर आठवडय़ाला टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढवून जून ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत पालिकेकडे ताब्यात असलेल्या खासगी लहान रुग्णालयांतील 2 हजार 269 बेडही पालिकेने ताब्यात घेतले आहेत. यामध्ये 360 अतिदक्षता उपचारांसाठी आहेत.
तसेच मुंबईतील 35 मोठय़ा रुग्णालयांमधील एकूण 4 हजार 800 बेड कोविड रुग्णांसाठी पुन्हा उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. म्हणजेच लहान व मोठी खासगी रुग्णालये मिळून 7 हजार बेड आहेत. तर बीकेसी जंम्बो कोविड सेंटरची क्षमता 2100 बेड, नेस्को 3 हजारांसह सर्व 6 जंम्बो कोविड सेंटर्समध्येच 9 हजार बेड मिळून 20 हजार बेड उपलब्ध होतील.
अशी आहे सद्यस्थिती
मुंबईत सद्यस्थितीत लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या 40 लाख असून 10 लाखांपेक्षा जास्त जणांचे लसीकरण पूर्ण.
मुंबईत सद्यस्थितीत दररोज 45 हजारांवर लसीकरण होत असून दररोज 1 लाख लसीकरण करण्याचे उद्दिष्टय आहे.
मुंबईत दररोज 60 हजार कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्टय असून यामध्ये 10 हजार रुग्ण आढळण्याचा अंदाज आहे.
सद्यस्थितीत 650 आयसीयू बेड, 250 व्हेंटिलेटर उपचारासाठी रिक्त आहेत.
निर्णय एका दिवसात होत नाही!
रुग्णांची संख्या जर वाढत गेली आणि बेडस् कमी पडायला लागले तर लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार होतो. अर्थात हा निर्णय काही एका दिवसात घेण्यात येत नाही. त्यासाठी अभ्यास करण्यात येतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले. नियम पाळा, लॉकडाउन टाळा असा साधा सल्लाही त्यांनी दिला.
अवघा देश संभाव्य धोक्यात
अवघा देश आज संभाव्य धोक्यात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे निती आयोगाच्या आरोग्य समितीचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, नांदेड, नगर, दिल्ली आणि बंगळुरू शहर या देशातील 10 जिह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असल्याची माहिती पेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.
कोरोनावरील लस आल्यावर लोकांना आता कोरोना संसर्गाचे गांभीर्य राहिलेले नसून ते सहजतेने घेत आहेत. लोकांनी आपले वर्तन सुधारल्यास महामारीच्या या संकटावर मात करणे शक्य होईल. – डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री
नियम पाळले नाहीत तर कठोर निर्णय
रुग्णवाढ होत असल्यामुळे सद्यस्थितीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम काय होत आहे, रुग्णसंख्या किती कमी होते याचा आढावा पुढील 15 दिवस घेण्यात येईल. नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.
कोविड अपडेट
राज्य
रुग्ण 27918
मृत्यू 139
मुंबई
रुग्ण 4760
मृत्यू 10
मंगळवारची रुग्णसंख्या
ठाणे – 926
नाशिक – 1723
पुणे – 3287
संभाजीनगर – 1020
नागपूर – 766
नगर – 661
नांदेड – 683
नवी मुंबई – 772
































































