देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; केरळ, महाराष्ट्रात चिंता वाढली – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यात केरळ आणि महाराष्ट्राचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रआलयाकडून सांगण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत देशभरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी केरळ आणि महाराष्ट्रात देशातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. देशात सध्या 4.31 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 97.3 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. देशातील 73 जिल्ह्यात दररोज 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. 4 मे रोजी अशा जिल्ह्यांची संख्या 531 होती.तर 2 जूनला 262 जिल्हे होते. त्यात आता घट झाली आहे.

केरळ महाराष्ट्रासह एकूण 5 राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशातील 50 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन राज्यांसह तामिळनाडू,आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच मणीपूर, मिझोराम,त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशातही रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यात मदतीसाठी केंद्राकडून 11 पथक पाठवण्यात आले आहे. त्यात ईशान्य हिंदुस्थानसह महाराष्ट्र, केरळ ,छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. जगभरातील अनेक देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे दररोज जगभरात 3.90 लाख नवे रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेत सुमारे 9 लाख नवे रुग्ण आढळत होते. तिसऱ्या लाटेचा देशात परिणाम होऊ नये, यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.