
जामखेड शहरात बुधवारी रात्री आणखी दोन करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर गुरुवारी दुपारी संगमनेरमध्ये चार जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 37 वर पोहोचली असून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
संगमनेर तालुक्यातील चौघे रुग्ण काही दिवसांपूर्वी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल मिळाला असून ते चौघेही करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 37 वर पोहोचली आहे. या चौघांना सर्दी, खोकल्याचा त्रास असल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. बुधवारी रात्री जामखेड येथील दोघांना करोनाची लागण झाली. त्यामुळे नगरचा आकडा आता 37 वर पोहोचला आहे. आतापर्यंत वीस जणांना डिस्चार्ज दिला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात जामखेड व कोपरगाव मधील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. आता जामखेड येथील दोघे व संगमनेर येथील चार पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्याचे 29 आणि 35 वर्षीय मुलगे बाधीत असल्याचे आढळून आले. या मुलांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यात या दोन व्यक्ती बाधीत असल्याचे आढळून आले.
































































