मुंबईकरांना काहीसा दिलासा; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त; 3 हजाराने रुग्णसंख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेला आठवडाभर घातलेले निर्बंध आणि दोन दिवस कडक लॉकडाऊनमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली असून आज दिवसभरात मुंबईत 6 हजार 905 रुग्ण सापडले असून रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्या 3 हजार 84 ने घटली आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढली आहे. मुंबईत आज दिवसभरात 9 हजार 37 कोरोनामुक्त झाले. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सोमवार, 5 एप्रिलपासून निर्बंधात वाढ करत सोमवार ते शुक्रवार 8 वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू केली तर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्यात आले तर सरकारी कर्मचायांना 50 टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालये, रस्ते, सार्वजनिक वाहतूक यातील गर्दी कमी झाली. त्याचा परिणाम आता दिसू लागला असून मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबईत रविवारी 8 हजार 554 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आज त्यात 483 ने वाढ होऊन 9 हजार 37 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र, दुर्दैवाने 43 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आज 39 हजार 398 कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 46 लाख 50 हजार 187 कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

रुग्ण दुपटीच्या कालावधीतही किंचित सुधारणा

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या मध्यापासून रुग्ण दुपटीचा कालावधी 550 वरून  कमी होत 35 दिवसांवर आला होता. आज त्याच्यातही पहिल्यांच सुधारणा होत हा सरासरी कालावधी एक दिवसाने वाढून 36 दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या सरासरीतही वाढ होऊन हा कालावधी 80 दिवसांवर पोहोचला आहे.