लॉकडाऊनमुळे रायगडातील 500 मजूर कुटुंबे अडकली कर्नाटकात

374

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे कामासाठी कर्नाटकमध्ये गेलेली 500 आदिवासी मजूर कुटुंबे अडकली आहेत. हे सर्वजण कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकातील चार जिल्ह्यात स्थलांतरीत झाले होते. मात्र या मजुरांना घेऊन गेलेले ठेकेदार पळून गेल्याने सर्वजण अडचणीत सापडले आहेत. या अडकलेल्या कुटुंबाची स्थानिक प्रशासनाकडून भोजन आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आदिवासी कुटूंबे दरवर्षी कोळसा भट्ट्यावर काम करण्यासाठी कर्नाटकमध्ये स्थलांतरीत होत असतात. नगर जिल्ह्यातील ठेकेदार त्यांना तिकडे घेऊन जातात. काम संपले की सर्वजण आपआपल्या घरी परतत असतात. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे देशभरात लॉक डाऊन जाहीर झाल्याने हे सर्वजण कर्नाटकात अडकून पडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या सर्वांना मजुरीसाठी नेणारे ठेकेदार पळून गेल्याने मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. हे सर्वजण कर्नाटकमध्ये चिकबेलापूरमधील अनंतपूर येथे, म्हैसूर जिल्ह्यातील नंदनगुड येथील शिवकाहल्ली आणि बंगलोर जवळील सिरा येथे हे सर्वजण अडकून पडले असल्याची माहिती सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी दिली.

स्थलांतरित आदिवासी मजुरांचा.हा प्रश्न सामाजिक संघटनांनी कर्नाटकमधील स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर तेथील तहसिलदारांनी या सर्वांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र लॉकडाऊन संपणार नाही तोवर या सर्वांना तिथेच राहावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या