कोरोना निगेटिव्ह असाल तरच कोल्हापुरात प्रवेश, चाचणी न करता आल्यास सक्तीने विलगीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 इतर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आता ‘आरटीपीसीआर’ व ‘ऑण्टिजेन’ चाचणी करून येणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात देखरेखीसाठी ग्राम, प्रभाग समित्या पुन्हा सक्रिय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, दोन वेळा कोविड लस घेतलेल्या आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना प्रवेश देण्यात येणार असून, चाचणी न करता येणाऱ्यांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांंतून या जिल्ह्यात येणाऱ्यांकडे कोरोना निगेटिव्ह अहवाल असेल तरच प्रवेश देण्यात येणार आहे. अहवाल नसणाऱ्यांना सक्तीने सात दिवस संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. गृहविलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करून ठेवता येणार आहे. त्यासाठी समितीला सतर्क राहण्याचा आदेशही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला आहे.

दरम्यान, छत्रपती राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या सर्वांची आज बैठक घेण्यात आली. यावेळी तलाठी, ग्रामसेवक आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी मतदान केंद्रनिहाय लसीकरणाबाबत नियोजन करावे, गावागावातील, शहरातील ग्राम, तसेच प्रभाग समित्या सक्रिय करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी दिल्या.