कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामतीमधील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड – 19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नवीन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नविन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.