लहान मुलांसाठी लस; लवकरच क्लिनिकल ट्रायल! 2 ते 18 वयोगटातील मुलांची होणार चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लहान मुलांना कोरोना संर्गापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय सध्यातरी समोर आहे. त्यामुळे 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर येत्या बुधवारपासून लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे. यासंदर्भात ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून चार दिवसांत हिरवा पंदील मिळण्याची शक्यता असून महाराष्ट्रात नागपूरमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू होणार आहे.

भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सिन ही लस लहान मुलांमध्ये ट्रायल घेण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मोठय़ा माणसांना ज्याप्रकारे दंडावर लस टोचण्यात आली होती त्याचप्रमाणे मुलांनाही लसीचा डोस दिला जाईल. पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी लसीची दुसरी मात्रा दिली जाईल. भारत बायोटेक तयार करीत असलेल्या या लसीच्या लहान मुलांवरील चाचण्या आता देशात मोजक्या ठिकाणी सुरू होत असून या संपूर्ण प्रक्रियेला सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच ही लस सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहे.

या चाचण्यांसाठी 2 ते 17  हा वयोगट गृहीत धरला आहे. या वयोगटाचे 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 व 12 ते 18 वर्षे असे तीन गटांत मुलांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

या वयोगटातील मुलांना इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाईल. पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल. जी मुले चाचण्यांसाठी निवडण्यात येतील त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात येतील.

या मुलांना यापूर्वी कोविड झालेला नको ही मुख्य अट असेल. याशिवाय त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली हवी, त्याला इतर गंभीर आजार नकोत. लस देण्याच्या वेळी सर्दी, खोकला, ताप नको या सर्व बाबी तपासण्यात येतील.
देशातील 525 मुलांवर ह्युमन ट्रायल होईल.

देशातील नवी दिल्ली, पाटणा, हैदराबाद आणि नागपूर अशा चार प्रमुख शहरांमध्ये 525 मुलांवर या लसीचे ह्युमन ट्रायल घेतले जाईल. त्यापैकी नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयात 75 मुलांवर या कोविड लसीचे ह्युमन ट्रायल होईल.