
हिंदुस्थानात आता लगीनसराईचा मोसम आहे. तो पुढचे किमान तीन महिने सुरू राहणार आहे. पण, या लगीनसराईच्या उत्साहावर पाणी फिरवणारी बातमी आहे. कारण, आता सोनं 45 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरवाढीचं कारण कोरोना व्हायरसचा वाढतं थैमान हे आहे.
सोन्याच्या दरात सोमवारी 953 रुपये इतकी वाढ होऊन ते 44 हजार रुपये प्रतितोळा इतकं झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला चांगलीच दरवाढ मिळाली आहे. सध्या प्रतिऔंस 1680 डॉलर इतक्या दराने सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात विकलं जात आहे. हा दर वाढून आता 1700 इतका होऊ शकतो. त्याचा परिणाम हिंदुस्थानातील सोन्याच्या भावावर पडण्याची शक्यता असून तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही दरवाढ आता 45 हजारांवर जाणार आहे.
सध्या चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जेव्हा अनिश्चिततेचं वातावरण तयार होतं, तेव्हा गुंतवणूकदार आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय चोखाळतात. सोनं हा एक खात्रीचा पर्याय असल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.



























































