
जगातील 200 बंदरांशी जलमार्गाव्दारे व्यापारी संबंध असल्याने जेएनपीटी प्रशासनाकडून बंदरातून कोरोना विषाणूंचा संसर्ग होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांची आणि जहाजांवरील सर्व क्रू मेंबरची समुद्रातच जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरकडून ( पीएचओ ) कसून तपासणी करण्यात येत आहे. पीएचओने तपासणी केल्यानंतरच मालवाहू जहाजांना जेएनपीटी बंदरात लॅण्डींगची परवानगी दिली जाते. कोरोना विषाणूंचा कोणत्याही परिस्थितीत प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पीएचओच्या तपासणीनंतरही विदेशी जहाजातील क्रू मेंबर्सना बंदरात उतरण्यास मनाई करण्यात येत असल्याची माहिती जेएनपीटीचे आरोग्य चिकित्सक डॉ.राज हिंगोराणी यांनी दिली.
केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरकडून जेएनपीटी बंदरातून कोरोना विषाणूंचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने कोव्हीड-19 बाबत दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या चीनमधील जहाजांवर जेएनपीटीने अनेक निर्बंध घातले आहेत. विशेषता चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या दिवसांपासून कोरोनाबाधीत देशांची यादी तयार करण्यात आली आहे.या यादीमध्ये चीन, थायलंड, हॉंगकॉंग, सिंगापूर,जपान,दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया,इराण, नेपाळ, इटली, जर्मनी,स्पेन आदी 15 देशांचा समावेश आहे. या कोरोनाबाधीत यादीतील देशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांबाबत अधिक सर्तकता बाळगण्यात येत आहे. या देशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांना गेल्या14 दिवसांपासून जेएनपीटी बंदरात येण्यास परवानगी दिलेली नाही. या 14 दिवसात मालवाहू जहाज आणि त्या जहाजांवरील सर्व क्रू मेंबर्स यांना तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरांच्या निरिक्षणाखाली समुद्रात जहाज नांगरुन ठेवण्यात आले आहे. या दरम्यान तीनही पोर्ट हेल्थ ऑफिसरांच्या निरिक्षणाखाली जहाज आणि त्या जहाजांवरील सर्व क्रू मेंबर्सची आरोग्याची कसून तपासणी केली जाते. आवश्यक त्या सर्व तपासण्या पुर्ण झाल्यावर आणि तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरांच्या परवानगी दिल्यानंतरच मालवाहू जहाज जेएनपीटी बंदरात लॅण्डींग केले जाते. मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यानंतरही जहाजांवरील एकाही क्रू मेंबर्संना बंदरात उतरु दिले जात नाही. तसेच दररोज जेएनपीटी आणि जेएनपीटी अंतर्गत असलेल्या खासगी डीपी वर्ल्ड,जीटीआय,भारत मुंबई कंटेनर टर्मिनल,एनएसआयसीटी आदी बंदरांमध्ये येणाऱ्या – जाणाऱ्या जहाजांचा आणि जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या तपासणीचा संपुर्ण तपशीलही तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरांच्या माध्यमातून तयार करून केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येतो, अशी माहिती डॉ.राज हिंगोराणी यांनी दिली.
जेएनपीटी बंदरात कोरोना विषाणूंचा संशयितांच्या तत्काळ विलिनीकरण आणि उपचारासाठी आपातकालीन व्यवस्था करण्यात आली आहे. संशयितांसाठी जेएनपीटी बंदरातच पोर्ट हेल्थ ऑफिसरांच्या देखरेखीखाली तीन प्री- बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जेएनपीटीच्याच कामगार वसाहतीतील ट्रॉमा सेंटरमध्येही आपात्कालीन व्यवस्था म्हणून आणखी आठ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे या क्षणापर्यंत तरी जेएनपीटी बंदरात एकही कोरोनाग्रस्त संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्याचे डॉ.राज हिंगोराणी यांनी स्पष्ट केले. जेएनपीटी बंदरात मालवाहू जहाजांची ये- जा सुरळीतपणे सुरू आहे. कोरोनाच्या भीतीचा बंदरातून होणाऱ्या आयात- निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचा दावा जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी केला आहे.

























































