कोरोनाचा धसका, शिंकला म्हणून कोल्हापुरात एकाला भर रस्त्यात चोपला

1314

चीनच्या व्यूहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा धसका सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा शिरकाव झाला असुन आतापर्यंत 49 रुग्ण आढळून आले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर आहे. राज्यात कोरोनाची किती दहशत पसरली आहे याचा प्रत्यय कोल्हापुरात घडलेल्या एका घटनेवरून येऊ शकतो. येथे शिंकला म्हणून एकाला भर रस्त्यात चोप देण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, कोल्हापुरातील गुजी गल्लीतून एक दाम्पत्य दुचाकीवरून जात होते. याच वेळी त्यांच्या शेजारून जाणार दुचाकीस्वार अचानक शिंकला. विशेष म्हणजे शासनाने खबरदारी म्हणून शिंकताना आणि खोकताना रुमाल वापरण्याचा सल्ला दिलेला असतानाही त्या व्यक्तीने कोणतीही गोष्ट वापरली नाही. याचा राग आल्याने शिंकलास का? असा जाब विचारत दाम्पत्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राज्यातील आकडा वाढला
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी नगर शहरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीकडे सरकली आहे. देशातही कोरोना रुग्णांची संख्या 160 पार गेली आहे.

गर्दी टाळण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच प्रमुख मंदिरे आणि पर्यटन स्थळे देखील बंद करण्यात आली आहे. मुंबईत गर्दी आटोक्यात आली नाही तर मोठा निर्णय घ्यावा लागेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या