
राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या आता 5 लाखांवर पोहचली आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 136 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 14 हजार 718 जणांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनामुळे 355 जणांचे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 38 लाख 62 हजार 184 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यापैकी केवळ 18.99 टक्के म्हणजेच 7 लाख 33 हजार 568 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यात एकूण 1 लाख 78 हजार 234 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे आज आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
मुंबईत दिवसभरात 1,350 कोरोना रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात 1,350 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 834 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 13,577 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 30 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 532 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 19 हजार 460 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 7 लाख 34 हजार 619 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 40,882 वर पोहोचली आहे.





























































