महाराष्ट्र कोरोनाला हरवतोय! ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला मोठे यश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला मोठे यश मिळत असून, राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने कमी होत आहे. राज्यातील करोनामुक्त रुग्णांचा आकडा आज 15 लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला असून रिकक्हरी रेट आता 89.85 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, दिल्लीत मात्र कोरोनाची तिसरी लाट आल्याची भीती व्यक्त होत असून दुसरीकडे केरळचेही टेन्शन वाढले आहे.

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगरसह राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभर सुरू केली. घरोघरी जाऊन शहरांसह ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी, औषधोपचार वेळेवर होत आहेत. मुख्य म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखला जात आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. गुरुवारी दिल्लीत 5739 नवे रुग्ण आढळले. दरम्यान, जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत जनतेने मास्कलाच लस समजले पाहिजे. मास्क लावलात तर कोरोना संसर्ग आणि वायू प्रदूषणापासून बचाव होईल असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे.

केरळचे टेन्शन वाढले

केरळमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये 6638 नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे ही संख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटावरून स्पष्ट होते.

अशी कमी झाली रुग्णसंख्या

महाराष्ट्रात 5 सप्टेंबरला 20 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले होते. 11 सप्टेंबरला 24886 नव्या रुग्णांची भर पडली. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत रोज सरासरी 24 हजार नवे रुग्ण आढळत होते. 24 सप्टेंबरनंतर रुग्णसंख्या 20 हजारांच्या खाली आली.कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मृत्युदरही 2.62 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची संख्या झपाटय़ाने खाली येत गेली. 25 ऑक्टोबरला 6059 नवे रुग्ण आढळले. 29 ऑक्टोबरला नवीन रुग्ण आढळल्याचे प्रमाण 5902 इतके खाली आले आहे. गुरुवारी दिवसभरात 7883 रुग्ण बरे होऊन घरी गेले. ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या