
देशातील अनेक तुरुंगात कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कैद्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशाच एका कैद्याने चक्क रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. झारखंडमधील धनबाद येथे हा प्रकार घडला असून या कैद्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उ़डाली आहे. या प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चौकशीचे व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये संटू गुप्ता हा तरुण कैदी रुग्णालयातच एका टेबलवर दारूचा ग्लास भरत असल्याचे दिसत आहे. त्या कैद्याच्या एका हातात बेडी आहे तर त्याच्या समोर टेबलावर वेगवेगळे हॉटेलमधले पदार्थ ठेवलेले दिसत आहेत. या कैद्यावर महिलांसोबत अश्लील वर्तन, मारहाण व छेडछाड केल्याचा आरोप असून त्या प्रकरणी सध्या तो तुरुगांत शिक्षा भोगच आहे.

























































