कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गोव्यात साथीचा रोग कायदा लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी गोव्यात सरकारने साथीचा रोग कायदा 1897 लागू केला आहे. कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात साथीचा रोग कायदा 1897 लागू केल्याचे जाहीर केले. नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करणे,10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या फक्त परीक्षा घेणे आणि उत्सवासह गर्दीचे सगळे सोहळे रद्द केले जावेत, अशी शिफारस आरोग्यमंत्री राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना केली आहे. सिनेमागृह,रेस्टोरंट, क्लबसारखी गर्दीची ठिकाणे बंद करण्याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शटडाउन झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने पुढाकार घेऊन हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव परिमल राय, उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, आरोग्य, पर्यटन, शिक्षण सचिव, पर्यटन संचालक, मुरगाव पोर्ट ट्रस्ट, विमानतळ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी होणार आहेत. या बैठकीत निर्णय झाल्यास गोव्यातील गर्दीचे कार्यक्रम, शाळा, सिनेमागृहे, उपहारगृहे, सोहळे रद्द होऊ शकतात. कोरोनाच्या सावटामुळे शनिवारी फातोर्डा येथे खेळवला जाणारा आयएसएलचा अंतिम सामना बंद दाराआड खेळवला जाणार आहे. त्याशिवाय 13 ते 16 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेला केटेवन सांगित महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा फटका पर्यटन उद्योगाला बसला आहे. शनिवारी शटडाउन करण्याचा निर्णय झाल्यास पर्यटन उद्योग कोलमडून पडणार आहे.