corona virus विरोधातील लढ्यासाठी दाक्षिणात्य कलाकारांचा पुढाकार

1675

जगभरात हजारोंचे जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. या व्हायरसच्या प्रभावामुळे जनजीवन संपू्र्णतः विस्कळीत झालं आहे. अनेक क्षेत्रांना कोरोनामुळे आर्थिक फटकाही बसला आहे. या क्षेत्रामधील एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे रिलीज पुढे ढकलण्यात आले असून चित्रीकरणही ठप्प आहे.

अशा कठीण प्रसंगात मदतीची अपेक्षा असणाऱ्या तमाम बॉलिवूडकरांनी मिठाची गुळणी धरली असली तरी दाक्षिणात्य कलाकारांनी मात्र पुढे येऊन सढळ हस्ते मदत केली आहे. कोरोनामुळे देशभरातल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गोरगरीब आणि हातावर पोट असणाऱ्या जनतेला बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले असल्याने हातातोंडाची गाठ कशी घालायची असा प्रश्न या जनतेला भेडसावत आहे. अशा गरजूंना मदत करण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले अनेक नामवंत चेहरे पुढे येऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची मदत करत आहेत.

दाक्षिणात्य कलाकारांमध्ये बाहुबली फेम अभिनेता प्रभास याने चार कोटी रुपयांची देणगी गरजूंसाठी दिली आहे. तर  सुपरस्टार पवन कल्याण याने सहाय्यता निधीला 2 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर महेश बाबू या कलाकाराने 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण तेजा या दोघांनीही अनुक्रमे एक कोटी आणि 70 लाख रुपयांची देणगी गरजूंसाठीच्या निधीला दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे थलैवा अशी ओळख असणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांनी तमीळ चित्रपटसृष्टीची मातृसंस्था असलेल्या फिल्म एम्पलॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेला 50 लाख रुपये देणगीस्वरूप देण्याची घोषणा केली आहे. तर अभिनेता कमल हासन यांनी आपलं स्वतःचं घर जनतेसाठी खुलं केलं असून पीडितांसाठी तात्पुरत्या स्वरुपाचं रुग्णालय म्हणून ते वापरात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या