
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने एक दिलादायक बातमी दिली आहे. सिरम इस्टिटय़ूटच्या कोविड 19 वरील लसीची चाचणी पुण्यातील भारती हाँस्पिटलमध्ये होणार असून पुढील दोन ते तीन महिन्यात सिरम इस्टिटय़ूटची लस उपलब्ध होईल अशी माहिती राज्याचे सहकार तसेच अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.
जगभरात कोविड 19 कर लस शोधण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटमध्ये सुद्धा कोरोनावर लसची निर्मिती सुरू आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी सिरम इन्स्टिटय़ूट व आयसीएमआरच्या वतीने देशभरातील 15 ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये पुण्यातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलचा समावेश आहे.
सिरम इन्स्टिटय़ूट व आयसीएमआरच्या माध्यमातून कोकीड लसीच्या चाचणीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली असून हे पाचही जण स्वयंस्फूर्तीने यासाठी पुढे आलेले स्वयंसेवक आहेत. या पाच जणांची निवड ही आयसीएमआरच्या निकषानुसार झाली आहे. या पाचही जणांची पहिली आरटीसीपीआर चाचणी केली जाईल. त्याच प्रमाणे जे तंदुरुस्त लोक आहेत, ज्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आहेत, त्यांना ही लस देण्यात येईल. त्यानंतर कोविड 19 पॉझिटिव्ह असलेल्यांनाही लस देण्यात येईल. या पाचही जणांच्या तब्येतीवर भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय टिम व आयसीएमआरचे संशोधक पुढील सहा महिने लक्ष ठेवतील, असेही डॉ. कदम यांनी म्हणाले.



























































