
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा ऍक्टीव्ह मोडवर आले आहे. जिह्यात कोरोना संदर्भातील निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच तुळजाभवानी मंदिरातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने दर्शन पासची संख्या आजपासून जिल्हाधिकाऱयांनी निम्मी केली आहे. आता केवळ 10 हजार मोफत दर्शन, 2 हजार पेड दर्शन पास देण्यात येणार आहेत. तसेच 65 वर्षापुढील वृध्द नागरीक तसेच 10 वर्षापेक्षा लहान मुलांना दर्शनासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.
मंदिरं सुरु केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात रोज 20 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तुळजाभवानीच्या दर्शनसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे 3 दिवस मोठी गर्दी होत होती. त्यामुळे हे 3 दिवस आणि मोठय़ा सण, उत्सवाला 30 हजार मोफत पास दिले जात होते.
सध्या मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे आता ही संख्या निम्यापेक्षा अधिक कमी करण्यात आली आहे. आता रोज फक्त 10 हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर 2 हजार पेड पास दिले जातील. आज रात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.


























































