
हिंदुस्थानात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्रीय सरकारने हिंदुस्थानात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हिंदुथानात आतापर्यंत 809 लोकांना या रोगाची लागण झाली आहे. त्यातील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात या रोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत या रोगाच्या दुसऱ्या टप्प्यात असलेला हिंदुस्थान आता या रोगाच्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. असा दावा कोविड -19 टास्क फोर्समधील डॉ. गिरधर ज्ञानी यांनी केला आहे. ‘द क्विन्ट’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.
मंगळवारी 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रमुख डॉक्टरांच्या बैठकीत डॉ. ज्ञानीही उपस्थित होते. याबाबत बोलता डॉ. ज्ञानी म्हणाले की, कोणत्याही संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत कम्युनिटी ट्रांसमिशन म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला रोगाचा संसर्ग होऊन प्रसार होणे हा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. या अवस्थेत साथीचा रोग फार वेगाने पसरतो आणि त्याचे स्रोत शोधणे कठीण होते. डॉ. ज्ञानी यांच्या मते, पुढील पाच ते दहा दिवस हे या साथीचा रोग रोखण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत. कारण आता ज्यांना या रोगाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये रोगाचे लक्षण दिसण्यास सुरुवात होणार आहे.
डॉ. ज्ञानी पुढे म्हणाले की, कोविड-19 रुग्णालये तयार करण्यासाठी आपल्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे. कारण येत्या आठवड्यात या रोगाचा कधीही स्फोट होऊ शकतो आणि त्याशी लढा देण्यासाठी आपल्याकडे आवश्यक ताकद आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालये तयार नाही. हिंदुस्थानात 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळा होता. त्यावेळी या रोगाशी लढा देण्यासाठी तयारी करता सरकारकडे पुरेसा वेळ होता. मात्र आता आपण या रोगाच्या तिसऱ्या टप्प्यात दाखल झाले आहोत. आता प्रश्न असा आहे की, आता आपल्याकडे या रोगाचा संसर्ग रोखायसाठी पुरेसा वेळ आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.



























































