नव्या आयुष्याचा इन्शाल्लाह!

505

>> अभिराम भडकमकर (अभिनेते, दिग्दर्शक)

कोरोनाने सारे जगणेच बदलले. याच काळात माझी ‘इन्शाल्लाह’ कादंबरी ऑनलाइन प्रकाशित झाली. कोरोनामुळे सकारात्मक बदल ही मी देवाची इच्छाच मानतो!

सध्या एका चित्रपटाचे स्क्रिप्टिंगचे काम सुरू आहे आणि लॉकडाऊनमध्ये ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी प्रकाशित झाली त्यासंदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या वाचून त्यांना उत्तर देणं यात व्यस्त आहे. लॉकडाऊनमध्ये खूप वाचन केलं. जे जुनं घरात होतं आणि कधीतरी वाचायचेय वाचायचेय असे करून राहिलं होतं अशी सगळी पुस्तकं वाचली. बऱयापैकी वाचन केलं. योगासने आधी करायचो, पण कामात व्यस्त असल्यामुळे त्यात खूप दिवसांचा गॅप पडला होता तो भरून काढला. योगासने पुन्हा सुरू केली आणि ती नियमित केली. लॉकडाऊन झाले त्याच्या चार दिवसांनंतर माझ्या ‘इन्शाअल्लाह’ पुस्तकाचे प्रकाशन बडोद्याला होतं, पण लॉकडाऊनमुळे तो कार्यक्रम रद्द झाला. म्हणून एक प्रयोग म्हणून मराठीतलं पहिलं ऑनलाइन प्रकाशन केलं. त्यामुळे त्याची सगळी तयारी, जुळवणी, लोकांच्या प्रतिक्रिया याच्यामध्ये बऱयापैकी वेळ गेला. मागच्या महिन्यातच या पुस्तकाचे प्रकाशन केले. या सगळ्यामध्ये छान वेळ गेला.

माझे आई-वडील पुण्यात असतात आणि मी मुंबईत असतो. तीन महिन्यांनंतर पुण्यात आलो आणि जूनपासून पुण्यातच आहे. त्यामुळे कुटुंबासोबत आनंद घेतोय. भावाची लहान नात आहे. तिच्यासोबत खेळणं, लहान मुलांची पुस्तकं वाचून दाखवणं अशी गंमत जंमत सुरू असते. त्यामुळे खूप चांगला वेळ लॉकडाऊनमध्ये घालवला. उत्तम वेळ घालवता आला, वाचन खूप झालं आणि बघणं खूप झालं. ऑनलाइनवर बऱयाच गोष्टी बघता आल्या. त्याच बरोबर काही गोष्टी या काळात कटाक्षाने पाळल्या त्या म्हणजे मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. त्या गोष्टीत तडजोड केली नाही. बाहेरून आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुणे, बाहेर जाताना सॅनिटायझर सोबत घेऊन जाणे या गोष्टी केल्या. या सगळ्यात मध्येच सर्दी झाल्यासारखे वाटले तर लगेच वाफ घ्यायचो. कारण घरी एक्याण्णव वर्षांची आई आणि भावाची पाच वर्षांची नात. त्यामुळे कुठेच निष्काळजीपण केला नाही. बाकी लोक उपाय सांगत होते, जसं की वाफ घेणं, काढा घेणं, सकस आहार घेणं यासारख्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱया गोष्टी घरच्या घरी केल्या आणि त्या नियमित केल्या. त्याचा नक्कीच फायदा होताना दिसला.

आपल्या आयुष्यात आपण बऱयाच अनावश्यक गोष्टींना अपरिहार्य करून ठेवले होतं. या सगळ्या गोष्टींचे किती क्षुल्लक स्थान आपल्या आयुष्यात होते हे लॉकडाऊनमुळे शिकता आलं. शॉपिग, खाणं-पिणं, फिरणं असा वेळ किती घालवत होतो ते एक लक्षात आले, पण कोरोनामुळे या गोष्टी अंगवळणी पडल्या आहेत, ज्याचा आपल्याला भविष्यात फायदाच होणार आहे. मला असं वाटतं की, आता आपण निरोगी आयुष्याकडे वळलो आहोत. जीवनमान उंचावण्यापेक्षा निरोगी जीवन कसे जगता येईल याबाबत सजग झालो आहोत. माझ्या मते आपण कोरोनाला न घाबरता पण त्याच्या बद्दल काळजी घेतली पाहिजे. काळजी करू नका, काळजीने वागा असा विचार आपण त्यामागे केला पाहिजे. या सगळ्यामध्ये एक लक्षात आलं की, भरपूर वाचले पाहिजे. वाचनाने मन किती गुंतून जातं हे कळलं. आता ऑनलाइन बऱयाच गोष्टी उपलब्ध होत आहेत. त्यात एका गोष्टीचा फार आनंद झाला की, माझी ‘इन्शाअल्लाह’ कादंबरी ऑनलाइन प्रकाशित झाली आणि लोकांनी त्याची मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन घरी ऑर्डर केली. लोकांना लक्षात आले की, आता दुकानात जायचीही गरज नाही, ऑनलाइन सोयींचा जास्तीत जास्त वापर करून घराबाहेर न पडता आयुष्य तितकंच सुंदर बनवून आपल्या लोकांना वेळ देऊ शकतो, आपल्यासाठी वेळ काढू शकतो हेच आपण त्यातून शिकलो.

आपली प्रतिक्रिया द्या