
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गुरूवारपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ‘क्यूआर’ कोड तपासूनच प्रवेश देण्याचा निर्णय लागू केला आहे. राज्य सरकारने अजूनपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना ‘क्यूआर’ कोड आधारीत ओळखपत्र वाटली नसल्याने त्यांना या निर्णयातून सूट असली तरी हळूहळू ‘क्यूआर’ कोड हा बंधनकारक करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मागणी केल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल, त्याआधी स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर ‘एसओपी’ जारी करण्यात येईल असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
कोरोना लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून देशभर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन हटविताना राज्य सरकारच्या विनंतीनूसार मध्य आणि पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक कमचाऱ्यांसाठी 15 जूनपासून मर्यादित प्रमाणात लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रत्येकी 350 फेऱ्या चालवित आहे. त्याद्वारे 1 लाख 25 हजार अत्यावश्यक कर्मचारी प्रवास करीत आहेत. वाढती गर्दी पाहून हार्बर मार्गावर आणखी दोन फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोरेगाव ते पनवेल थेट सेवा लटकली
हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार झाला तरी अद्याप गोरेगाव-पनवेल अशा वडाळा मार्गे थेट लोकल सेवेला मुहूर्त मिळालेला नाही. यासंदर्भात प्रश्न विचारताच गोयल यांनी उत्तर देण्यास नकार दिला. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही या सेवेची गरज नसल्याचे सांगितले.
…तर जेईई-नीटसाठी लोकल प्रवेश
जेईई-नीट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असल्याने या विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवेश असेल काय या प्रश्नावर जर राज्य सरकारने आमच्याकडे मागणी केली तर आम्ही चालवायला तयार आहोत. कोणत्याही नव्या घटकांना प्रवेश देताना याविषयी राज्य सरकार रेल्वे बोर्डाला कळविते. त्यानंतर रेल्वे बोर्ड आणि गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर आम्ही अंतिम निर्णय घेत असतो गोयल यांनी सांगितले.
हळूहळू शंभर टक्के बंधनकारक
अत्यावश्यक प्रवाशांचे ओळखपत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ठ अंतर राखून तपासणे शक्य व्हावे यासाठी रेल्वेने राज्य सरकारच्या मदतीने ‘क्यूआर’कोड आधारीत ई-ओळखपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी आस्थापनांकडून ई-ओळखपत्र वाटण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी रेल्वेने 15 स्थानकांवर ‘क्यूआर’ कोडची तपासणी सुरू केली असून हळुहळू ती शंभर टक्के बंधनकारक करण्यात येणार आहे.
ठाणे ते दिवा मार्गिका पुढच्या पावसाळ्यापर्यंत
लॉकडाऊनच्या काळात मजूर उपलब्ध न झाल्याने ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे कामकाज खोळंबले असले तरी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिल्याचे विभागीय व्यवस्थापक गोयल यांनी सांगितले.


























































