
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. कर्नाटक, दिल्ली व मुंबईपाठोपाठ गुरुवारी पंजाबात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. जर्मनी, इटलीचा प्रवास करून हा वृद्ध मायदेशी परतला होता. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आज 178 वर गेली.
पंजाबात जर्मनी, इटलीहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. नवांशहरच्या पठलावा गावातील या वृद्धाचीही 11 मार्च रोजी तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी कविता शर्मा यांनी सांगितले. मात्र 18 मार्च रोजी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. नातलगांनी त्यांना तातडीने रुग्णालयात आणले, परंतु अर्ध्या तासातच त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य पथकाने मृतदेहातून घेतलेले काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्यात या वृद्धाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.
22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून एक आठवडय़ापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या काळात परदेशातून येणाऱया विमानांनाही उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. दहा वर्षांखालील मुले, ज्येष्ठ नागरिकांनी किमान एक आठवडाभर घरातच थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले.



























































